– पोलिसांनी बनावट अपहरणाचे पाडले उघड पितळ
पुणे, प्रतिनिधी : स्वतःच्याच अपहरणाचे नाट्य रचत एका सुरक्षरक्षक तरुणाने कुटूंबालाच दोन लाखांची खंडणी (Drama of his own kidnapping, demanding a ransom of two lakhs from his family) मागितली. पण, त्याच्या या बनावट अपहरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश करत त्यालाच बेड्या ठोकल्या आहेत. बाणेर पोलिसांनी ही नाट्यमय अपहरणाची कहाणी उघडकीस आणली आहे.
मनिषकुमार द्विवेदी (२१ रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
मनिषकुमार बाणेरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. ९ फेब्रुवारी रोजी गावी जात असल्याचे सांगून तो निघाला. मात्र, त्याच रात्रीपासून त्याचा मोबाईल बंद लागला. १० फेब्रुवारी रोजी त्याच्या मोबाईलवरून वडील आणि भावाला व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज पाठवला. “तुमचा मुलगा जिवंत पाहायचा असेल तर सहा तासांत दोन लाख रुपयांची व्यवस्था करा. पोलिसांना कळवले तर त्याला ठार मारू,” अशी धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली होती. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने बाणेर पोलिसांकडे धाव घेतली.
गुन्हा नोंद होताच वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी विशेष पथकाची स्थापनाकरत तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक तपासातून मनिषकुमारचे कथित अपहरण झाले नसून तो शहरात विविध ठिकाणी मित्रांकडे जात असल्याचे उघड झाले. पुढील तपासात तो अहमदाबादमार्गे प्रयागराज येथे गेल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. २३ फेब्रुवारी रोजी मनिषकुमारला पुण्यात आणून चौकशी केली असता, त्याने खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली दिली. नातेवाईकांकडून ऑनलाइन दहा हजार रुपये आगाऊ घेतल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक करून रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या भितीने स्पा मॅनेजरसह तरुणीने मारली उडी, तरुणीचा मृत्यू
ही कारवाई अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त रजनीकांत चुलूमुला यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत व त्यांच्या पथकाने केली आहे.