पुणे, प्रतिनिधी : सोन्याचे भाव गगणाला भिडले आहेत. सोन्याची तेजी दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेला स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने तब्बल १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. (1 crore 34 lakhs cheated with the lure of cheap gold)
पुण्याच्या कात्रज भागात हा प्रकार घडला असून, पुणे पोलिसांनी याप्रकरणी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनुसार, हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५), रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज भागात राहायला आहेत. आरोपींशी त्यांची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्याने त्यांना स्वस्तात सोने मिळवून देतो, असे आमिष दाखविले. नंतर त्यांना मोबाइलवरुन सोन्याचे बिस्कीट, तसेच दागिन्यांची फोटो पाठविली. ‘सोन्याचा सध्या दर कमी आहे. येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढणार आहे. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल’, असे आमिष त्यांना आरोपींनी दाखविले. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीला सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. नंतर त्यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले. आरोपींनी त्यांना ७ लाख २३ हजार रुपयांचे सोने, तसेच ७ लाख ९० हजार रुपये दिले. नंतर त्यांना उर्वरित रक्कम, तसेच स्वस्तात सोने मिळवून दिले नाही. परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला आणि पतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी दाम्पत्याने १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भोसले करत आहेत.