पुणे : प्रतिनिधी, शहरात आज महाविद्यालये तसेच शाळांमध्ये पालक अन् विद्यार्थ्यांच्या घाई, गडबड अन् एकमेकांना शुभेच्छा देतानाचे चित्र पाहिला मिळाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला शहरात मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. यंदा शहरातून तब्बल २ लाख ६० हजार १४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातआहेत. परीक्षा केंद्रांवर सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांची लगबग पाहायला मिळत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकता, अपेक्षा आणि किंचित घबराट असे मिश्र वातावरण दिसून आहे.
HSCExam; राज्यभरात बारावीची परीक्षा; यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी देणार परिक्षा
त्याप्रमाणे शहरातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात वेळेआधीच विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. शेवटच्या क्षणी नोट्स चाळणे, मित्रमैत्रिणींशी चर्चा करणे, प्रवेशपत्राची खात्री करणे अशी धावपळ सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही पुढील करिअरचा मार्ग ठरवणारी महत्त्वाची पायरी असल्याने ताण जाणवत असला, तरी आत्मविश्वासही तितकाच दिसून आला. अनेक पालक आपल्या मुलांना धीर देखील देत असताना दिसले. पालकांनी मुलांना “शांतपणे पेपर सोडव, घाई करू नकोस,” असा सल्ला देत शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहावे, प्रश्न नीट वाचून उत्तरे लिहावीत, वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, तसेच भरारी पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळो, अशा शुभेच्छा विविध स्तरांतून दिल्या जात आहेत. परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थी उत्तम यश संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.