पुणे | प्रतिनिधी मैत्रिणीसोबत झालेल्या वादानंतर लोणावळ्यात हवेत गोळीबार (Lonavala firing case) करणारा कंत्राटदार राहुल तारू याने चक्क पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नावातील बदल आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाना मिळवल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तारूवर गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण? २१ जानेवारी २०२६ रोजी राहुल तारू हा मैत्रिणीसोबत लोणावळ्यातील मॅप्रो गार्डन परिसरात गेला होता. तेथे त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत दोनदा गोळीबार केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत त्याला पौड परिसरातून ताब्यात घेतले. तपासादरम्यान राहुलकडे परवाना असलेले पिस्तूल आढळले, मात्र या परवान्यामागचे ‘बिंग’ फुटल्याने पोलीसही चक्रावून गेले.
असा केला बनाव…
राहूलने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याने खालील लबाडी केली:
नावात बदल: स्वतःचे नाव राहुल असताना ‘भूषण’ असे भासवले.
बनावट पत्ता: लोणी काळभोरमधील स्वप्नशील सोसायटीत भाड्याने राहत असल्याचे खोटे पुरावे दिले.
खोटा भाडेकरार: परवाना मिळवण्यासाठी बनावट रेंट अॅग्रीमेंट आणि शपथपत्र सादर केले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवली: स्वतःवर ४ गंभीर गुन्हे दाखल असतानाही, प्रतिज्ञापत्रात कोणतीही गुन्हेगारी नोंद नसल्याचा दावा केला.
एजंटच्या मदतीने फसवणूक
राहुलला हा बनावट परवाना मिळवून देण्यात एका एजंटने मदत केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या एजंटच्या माध्यमातून त्याने शासन आणि पुणे पोलीस आयुक्तालयाची दिशाभूल केली. पोलिसांनी आता या एजंटचाही शोध सुरू केला आहे.
गुन्हेगारीचा जुना इतिहास
राहुल उर्फ भूषण तारू हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी पुणे शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत:
सहकारनगर पोलीस ठाणे: २०००, २००६ आणि २०११ मध्ये गुन्हे दाखल.
बंडगार्डन पोलीस ठाणे: येथेही एका गुन्ह्याची नोंद.
शस्त्र परवाना रद्द होणार? बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेला हा परवाना आता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गोळीबार प्रकरणानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर अहवालावरून ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत.