पुणे, (Ajit Pawar plane crashed) राज्य सरकारने बारामतीत घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू (ईडी) म्हणून करण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेत राज्य सरकारने तपास ‘सीआयडी’कडे दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे खासगी विमानाने त्यांच्या अंगरक्षक तसेच इतर दोन अश्या व्यक्तीसोबत २८ जानेवारीला मुंबईहून बारामतीला जात होते. त्यावेळी लँडिंगवेळी विमानाला झालेल्या अपघातात पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक तपास केला. तसेच, अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. या अपघातासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आल्यानंतर तपास केवळ प्राथमिक स्वरूपापुरता मर्यादित ठेवता स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या प्रकरणी सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. ‘बारामती तालुका पोलिस ठाण्यात नोंद असलेला अपघाती मृत्यूचा गुन्हा आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सीआयडीकडून विमानाच्या तांत्रिक स्थितीची माहिती, अपघाताच्या वेळी असलेली परिस्थिती, निष्काळजीपणा किंवा अन्य कारणांचा तपास केला जाणार आहे.