पुणे, प्रतिनिधी,
प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू (firing at Rohit Shetty’s house) परिसरातील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या इनपुटवरून पुणे पोलिसांनी पाच संशयितांना पकडले असून, पुढील तपासासाठी त्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जुहू येथील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या परिसरात मध्यरात्री चार गोळ्या झाडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. शेट्टी टॉवर्स या दहा मजली इमारतीत अनेक नामवंत कलाकार राहतात. परिसरात कडक पोलिस व खासगी सुरक्षा असतानाही ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मुंबई गुन्हे शाखेला गोळीबाराचे धागेदोरे पुण्याशी जोडले गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी वडगाव, धायरी, कर्वेनगर परिसरातून पाच संशयितांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत या संशयितांनी प्रत्यक्ष गोळीबार केला नसला, तरी शुटरला मदत, हेरगिरी, वाहन पुरवठा आणि परिसराची टेहाळणी केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या वेळी हे आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे कनेक्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबा सिद्धीकी यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोपींपर्यंत जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या हत्येच्या तपासातही पुण्यातील काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. या गोळीबारामागे देशातील एका गुन्हेगारी टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.
आरोपी हे पुण्यातील गँगशी संबंधित नाहीत. मात्र, काहीजन शिक्षण तर काहीजन कामधंदा करतात. तर एकजन भाजी विक्रीचा देखील व्यवसाय करत असल्याचे समजते. या तरुणांना गुन्हेगारीचे आकर्षण असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले असून, त्याचाच फायदा गोळीबार करणार्यांनी घेतला आहे. पोलिसांकडून आता या तरुणांकडे कसून चाैकशी केली जात आहे. हे तरुण गोळीबार करणार्या तरुणांच्या संपर्कात कसे आले. त्यांनी आणखी कोणाची टेहाळणी केली आहे का, आणखी काही मदत केली आहे का तसेच हे इतर कोणाशी संबंधित आहेत का यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. मुंबई गुन्हे शाखेने काही तासात या गोळीबाराचे कनेक्शन उघडकीस आणले आहे. दहशतीसाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.