पुणे, प्रतिनिधी, शहरात वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि नव्याने कार्यान्वित झालेली (Reorganization of Crime Branch) पाच पोलिस ठाणी व दोन परिमंडळे लक्षात घेता शहर गुन्हे शाखेची मोठी पुनर्रचना करण्यात आली आहे. या बदलामुळे गुन्हेगारी नियंत्रण अधिक प्रभावी होण्यासोबतच तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) यांनी यासंदंर्भाने आदेश दिले आहेत.
आतापर्यंत पुणे शहरात गुन्हे शाखेची ६ युनिट कार्यरत होती. नव्या पुनर्रचनेनुसार आता ७ युनिट कार्यरत राहणार असून, एक अतिरिक्त सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदही मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील ७ परिमंडळांसाठी स्वतंत्र ७ गुन्हे शाखा युनिट काम पाहणार आहेत. सध्या पुणे शहरातील ४४ पोलिस ठाणी व एक सायबर पोलिस ठाणे आहे. गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांवर गुन्हे शाखेच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. गुन्हे शाखेअंतर्गत युनिट्ससोबतच खंडणीविरोधी, अंमली पदार्थ विरोधी तसेच दरोडा व वाहनचोरी विरोधी अशी प्रत्येकी दोन पथके कार्यरत असून, एकूण १२ विशेष पथके शहरात सक्रिय आहेत. ही सर्व यंत्रणा अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे. नव्या रचनेनुसार चार ACP मध्ये जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे.
-
ACP 1 : अंतर्गत युनिट 1 ते 3, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1
-
ACP 2 : अंतर्गत युनिट 4 ते 7, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 2
-
ACP 3 : खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक 1 व 2
-
ACP 4 : प्रशासन, भरोसा सेल, AHTU (मानव तस्करी प्रतिबंधक युनिट)
परिमंडळनिहाय गुन्हे शाखा युनिट
पुणे शहरातील ४४ पोलिस ठाण्यांचे ७ परिमंडळांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र गुन्हे शाखा युनिट कार्यरत राहणार आहे. तसेच, खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकासाठी स्वतंत्र ACP नेमण्यात आला आहे.