पुणे, प्रतिनिधी
केंद्र सरकारने रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. समिश्र प्रतिक्रिया या (Pune Growth Hub) अर्थसंकल्पावरून उमटत असताना पुणेकरांमध्ये मात्र, आनंदाचे वातावरण आहे. कारण, या अर्थसंकल्पात पुण्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. ‘पुणे ग्रोथ हब’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी पुढील पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पुण्याला देशातील आघाडीच्या आर्थिक वाढीच्या केंद्रांपैकी एक बनवण्याचा मानस असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. २०२६ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात पुण्याच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे, असा दावा देखील सरकारच्या वतीने केला जात आहे.
पुणे ग्रोथ हब’च्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान, उत्पादन, ऑटोमोबाईल, स्टार्टअप्स, संशोधन आणि सेवा क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि कौशल्यविकासाचा समन्वय साधत पुण्याची औद्योगिक क्षमता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याची ओळख केवळ ‘नॉलेज सिटी’ म्हणून न राहता मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेशन हब म्हणून अधिक भक्कम होईल असे म्हंटले जात आहे. त्यासोबतच गुंतवणुकीमुळे थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे. उद्योगपूरक वातावरणामुळे खासगी गुंतवणूक वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला सकारात्मक चालना मिळेल.
मेट्रो, हाय-स्पीड रेल्वेने कनेक्टिव्हिटी मजबूत
गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीने मेटाकुटीला आलेले पुणेकरांना कोंडीतून मुक्त करण्यासाठी राबविला जाणारा पुणे मेट्रो प्रकल्प आणखी मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पात ५१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाला गती मिळणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
मुंबई–पुणे व पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर
मुंबई–पुणे व पुणे–हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रकल्पांसाठी १०,१०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रवासाचा वेळ कमी झाल्यास उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी हॉस्टेल उभारण्याच्या योजनेमुळे पुण्यात शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षित व परवडणारी निवासव्यवस्था मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅज्युअल्टी व ट्रॉमा सेंटर उभारण्याचा निर्णय आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी एकात्मिक शहरी नियोजन राबवले जाणार असून, पुण्याच्या विस्ताराला शाश्वत आणि नियोजनबद्ध दिशा मिळणार आहे. ‘पुणे ग्रोथ हब’साठीची ५ हजार कोटींची तरतूद पुण्याच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी निर्णायक ठरणार असून, रोजगार, गुंतवणूक आणि पायाभूत विकासाच्या नव्या संधी शहरासाठी खुल्या होणार आहेत.