पुणे, शहरात बंद घरे तसेच दुकान फोडणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना आंबेगाव पोलिसांनी प्रसिद्ध “चितळे बंधु”चे (The innkeeper who broke into Chitale Brothers’ shop was arrested) दुकान फोडणाऱ्या सराईतासह दोघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
ओमकार मारूती देडे (वय २१, रा. धायरी) याला अटक केली आहे. तर त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून आंबेगाव पोलिस ठाण्यातील दोन व विमानतळ पोलिस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघड झाले आहेत.
शहरात सातत्याने बंद फ्लॅट फोडले जात आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात (दि २५ जानेवारी) चितळे बंधु यांचे दुकान फोडत रोकड चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांत गुन्हा नोंद होता. दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानूसार पथकाने या भागातील सीसीटीव्ही तपासले त्यात आरोपी कैद झाले होते. शोघ घेत असताना ओमकार देडे व त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. या माहितीनुसार ओमकार याला ताब्यात घेतले. त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबूली दिली. तिघांना ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल झाली. त्यांच्याकडून रिक्षा, रोकड, दुचाकी असा ऐवज देखील जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते, सहाय्यक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलिस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे, शिवाजी पाटोळे व त्यांच्या पथकाने केली.