पुणे, प्रतिनिधी, पुण्यासह राज्यभरात गाजलेल्या कल्याणीनगर येथील पोर्शे अपघातप्रकरणात गेल्या १९ महिन्यांपासून (Bail granted to the three in the Porsche accident case) कारागृहात असलेल्या दहा जणांपैकी त्या तिघांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला. तिघांना रक्तबदलकरून पुरावे नष्ट करण्याच्या गंभीर आरोपांखाली अटक केली होती. न्यायालयाने जामीन मंजूर करताना अल्पवयीन मुलांच्या बेफिकीर वर्तनामागे पालकांची थेट जबाबदारी असल्याचे स्पष्ट शब्दांत बजावत न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले. मौजमजेसाठी मुलांच्या हातात कारच्या चाव्या देणे आणि अमाप पैसा पुरवणे अजिबात स्वीकारार्ह नसल्याचे न्यायालयाने ठणकावून सांगितले. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना व न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
अमर सतीश गायकवाड, आदित्य अविनाश सूद (वय ५२) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७) यांना सोमवारी जामीन मंजूर करण्यात आला. या तिघांवर अल्पवयीन चालकासह त्याच्या दोन मित्रांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग, अशपाक मकानदार, ससून रुग्णालयातील तत्कालीन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने १६ डिसेंबर २०२५ रोजी नऊ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर संबंधित आरोपींनी नामवंत वकिलांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय आहे प्रकरण?
१८ मे २०२४ रोजी मध्यरात्री कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. अपघातापूर्वी चालक आणि त्याचे दोन मित्र मुंढव्यातील पबमध्ये मद्यपान करून बाहेर पडल्याचे तपासात निष्पन्न झाले. रक्त तपासणीदरम्यान ससून रुग्णालयात नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना लाच देण्यात आल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी केला आहे. आरोपपत्रानुसार, नमुने बदलण्यासाठी लाखो रुपयांची रक्कम दिली गेली.
अजूनही सहा आरोपी कोठडीत
अपघातास कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन चालकाला सुरुवातीला बाल न्याय मंडळाकडून निबंध लेखनासारख्या अटींवर जामीन देण्यात आल्याने देशभर संतापाची लाट उसळली होती. नंतर न्यायालयीन आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात आली. सध्या विशाल अगरवालसह सहा आरोपी अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्यायालयाचा स्पष्ट संदेश
अल्पवयीनांचे बेजबाबदार वर्तन हे अपघात नाही, तर पालकांच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. पैसा, गाड्या आणि मोकळीक देऊन जबाबदारी झटकता येणार नाही.