– संचालक मंडळाचा ऐतिहासिक एकमताचा निर्णय
पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाचे नामकरण आता ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’, (Katraj Milk Association named after ‘Ajitdada Pawar’) असे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे. दिवंगत अजितदादा पवार यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघाकडून देण्यात आली.
पाच दिवसांपुर्वी (दि. २८ जानेवारी २०२६) अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर संपूर्ण सहकार क्षेत्रात शोककळा पसरली होती. सहकार चळवळ आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील दूध संघासाठी ही हानी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे.
संघाच्या माहितीनुसार, अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. संघाच्या वार्षिक सभांना त्यांची उपस्थिती लाभली होती. संस्थेची कार्यप्रणाली, विस्तार आणि प्रशासकीय समन्वयासाठी त्यांनी मोलाचे पाठबळ दिल्याचे संघाने नमूद केले. पवार कुटुंबाचेही सहकार क्षेत्राला सातत्याने सहकार्य लाभत आल्याची भूमिका संघाकडून मांडण्यात आली. संघाच्या विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विशेषतः पायाभूत सुविधा उभारणी आणि दीर्घकालीन नियोजनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत—अजितदादांची भूमिका महत्त्वाची होती, अशी माहिती संघाने दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थात्मक बळकटी देणे आणि सहकारी संस्थांना सक्षम बनवण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून मिळालेले त्यांचे पाठबळ कायम स्मरणात राहील, अशी भावना संघातील पदाधिकारी आणि संचालकांनी व्यक्त केली. दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा ठराव मांडण्यात आला. या बैठकीस व्हा. चेअरमन तानाजी जगताप यांच्यासह संचालक गोपाळराव अण्णा म्हस्के, विष्णुकाका हिंगे, बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब खिलारी, केशरताई पवार, भगवान बाप्पू पासलकर, दिलीप नाना थोपटे, राहुल दिवेकर, भाऊसाहेब देवाडे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, निखिल तांबे, लताताई गोपाळे, चंद्रकांत भिंगारे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालकांनी ठरावाला एकमताने मंजुरी दिली. संघाने स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ नामांतरापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या नेतृत्वाची कायम स्मृती जपण्याचा प्रयत्न आहे. नामकरणासंदर्भातील पुढील प्रशासकीय प्रक्रिया, आवश्यक परवानग्या आणि नोंदी पूर्ण करण्याची कार्यवाही संबंधित स्तरावर सुरू करण्यात येणार असल्याचेही संघाने सांगितले.
————