पुणे, पोलिस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Where has the work of CP, Police Commissionerate come to? Police officers remember Ajit Pawar) हे अत्यंत आग्रही होते. काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे, यासाठी ते सातत्याने लक्ष ठेवून असत, याचा प्रत्यय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा आला. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना थेट विचारणा केली, ‘सीपी, पोलिस आयुक्तालयाचे काम कुठवर आले आहे? सगळं व्यवस्थित सुरू आहे ना ?’ तेव्हा कामाला अपेक्षित गती नसल्याचे सांगताच क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांनी संबंधित कंत्राटदार कंपनीच्या प्रमुखाला फोन करून फैलावर घेतले. ‘काम वेळेत पूर्ण झालेच पाहिजे. चालढकल नको,’ असा दमही त्यांनी भरल्याची माहिती पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुणे पोलिस आयुक्तालयाची इमारत कमी पडत होती. सोबतच गेल्या काही वर्षात झालेल्या मनुष्यबळ वाढीने सध्याची इमारत अपुरी पडत होती. तत्कालीन पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी यापूर्वी अजित पवार यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा ‘तातडीने नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवा, लगेच मंजुरी देतो,’ असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार पुणे पोलिसांनी प्रस्ताव सादर केला आणि त्याला तत्काळ मान्यताही मिळाली. नंतर आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू झाले.
गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. याप्रकल्पावर अजित पवार यांचे लक्ष सातत्याने होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत सव्वा ते दीड तास विविध विषयांवर चर्चा केली. यात पोलिसांच्या अडचणींसह शहरातील विविध समस्यांवरही सविस्तर चर्चा झाली. दरम्यान, २८ जानेवारी रोजी बारामतीला जात असताना सकाळी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अवघ्या दोन दिवस आधी त्यांनी पोलिस आयुक्तालयाच्या कामाबाबत दाखवलेली ही तळमळ आणि काटेकोरपणा आजही अधिकाऱ्यांच्या स्मरणात आहे. त्यांनी अजित पवारांची आठवण काढत त्यांच्या कामाबाबत कौतुक केले.
जागेचा अडसर…
सध्या पोलिस आयुक्तालयाची मुख्य इमारत कायम ठेवून उर्वरित जुन्या वास्तू पाडल्या आहेत. त्या जागेवर नवीन इमारत उभारली जात आहे. मात्र, संपूर्ण जागा एकाचवेळी ताब्यात न मिळाल्याने कामावर मर्यादा येत असल्याचे कंत्राटदार कंपनीचे म्हणणे आहे.