पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy Chief Minister Sunetra Pawar is the Guardian Minister of Pune and Beed) यांची मंगळवारी (दि. ३ फेब्रुवारी) पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि मराठवाड्यातील बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला आहे.
सुनेत्रा पवार यांचे माहेर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आहे. बीड या शेजारील जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदामुळे त्यांना आपल्या माहेरच्या भागात थेट काम करण्याची संधी मिळणार आहे. पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हे प्रशासकीय, राजकीय आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असलेल्या सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि. ३१ जानेवारी) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही खाती सोपवण्यात आली. उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच त्यांच्यावर पुणे व बीड या दोन जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुणे आणि बीड ही दोन्ही पालकमंत्रीपदे रिक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची या दोन्ही जिल्ह्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार यांनी सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. नंतर सन २०२५ मध्ये त्यांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली. पर्यावरण आणि शाश्वत विकास क्षेत्रात त्यांचे योगदान विशेष मानले जाते. त्यांनी सन २०१० मध्ये ‘एनव्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ (EFOI) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली असून, सध्या त्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. ही संस्था पर्यावरणीय जागरूकता वाढवणे आणि पर्यावरण-जागरूक समुदाय निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याने आगामी काळात या जिल्ह्यांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.