पुणे : उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वतीनगर येथे एका बहुमजली इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये महिलांना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला.(Prostitution business in Uttamnagar exposed; immoral type was being run from a flat in a multi-storey society;)
गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने छापा कारवाईकरून दोन महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गौरी विकास पवळे (वय ४५, रा. उत्तमनगर) हिला अटक करण्यात आली आहे. तिच्याविरोधात उत्तमनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ (३) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात स्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावरही सातत्याने कारवाई सुरू असताना छुप्या पद्धतीने अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू आहेत. उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सरस्वतीनगर भागात योगिराज कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने सदर फ्लॅटवर छापा टाकला. छाप्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून मुख्य सूत्रधार असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उत्तमनगर पोलिस करत आहेत.