– १ मे ते १५ जून २०२६ दरम्यान डिजिटल पद्धतीने घरगणना
पुणे, प्रतिनिधी : भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या भारत जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरांची यादी व घरगणना (House Listing & Housing Census) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीत १ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही संपूर्ण जनगणना मोहीम पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या मार्गदर्शनानुसार पुणे शहरातील १५ चार्ज जनगणना अधिकारी तसेच शहर जनगणना अधिकारी यांना आवश्यक सूचना आणि कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जनगणनेची सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश बैठकीत देण्यात आले.
यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरात प्रथमच जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे जनगणना प्रगणकांची नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, मोबाईल व टॅब-आधारित माहिती संकलन प्रणाली, डेटा सुरक्षितता आणि तांत्रिक अडचणींचे व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार ही सर्व पूर्वतयारी पूर्ण केली जाणार आहे.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी बैठकीदरम्यान सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जनगणना यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय व तांत्रिक तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. डिजिटल प्रणालीमुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, वेगवान आणि पारदर्शक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घरांची यादी आणि घरगणनेच्या माध्यमातून शहरातील निवासी व अनिवासी इमारती, घरांचा वापर, पायाभूत सुविधांची स्थिती यासंबंधी महत्त्वाची माहिती संकलित केली जाणार असून, ही माहिती भविष्यातील शहर नियोजन, पायाभूत सुविधा विकास आणि धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जनगणना प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.