पुणे; शहरातील प्रसिद्ध रस्ता असलेल्या फर्ग्युसन रोडवर पुणे पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा पकडल्याने मोठी खळबळ उडाली. दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी चार पिस्तूल तसेच पाच जिवंत काडतूसे त्यांच्याकडून जप्त केली आहेत.(Sensational; Police seize large cache of weapons on Ferguson streets) तत्पुर्वी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर अन् त्याची विक्रीप्रकणात नुकतीच ऐतिहासिक कारवाई केल्यानंतरही पुन्हा पुण्यात उमरटीतूनच शस्त्रसाठा येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही शस्त्रे विक्रीसाठी शहरात आणल्याची प्राथमिक माहिती असून, या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी साखळीवर मोठा आघात झाला आहे.
रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४, रा. जुनी सांगवी) आणि अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याची माहिती पुणे पोलिसांनी प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत मध्यप्रदेशातील उमरटी येथे जाऊन पिस्तूल बनविणारे कारखाने उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, खंडणी विरोधी पथक-२ चे पोलिस अंमलदार गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, रोहित धर्माधिकारी हा ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात शस्त्रांसह आला आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने सापळा रचून रोहित आणि त्याचा साथीदार अभिषेक यांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली.
आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्यांच्यावर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पकंज देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, रविंद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, साहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, गणेश खरात, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी केली.