पुणे : प्रतिनिधी, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी (Eliminate hooliganism; orders from Director General of Police Sadanand Date) दिले. पाषाण येथील बिनतारी संदेश विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कायदा व सुव्यवस्थेची सविस्तर समीक्षा केली.
या बैठकीला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहर आणि जिल्ह्याचा झपाट्याने वाढणारा विस्तार, औद्योगिक वसाहतींमुळे होणारी लोकसंख्येची वाढ आणि परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता संघटित गुन्हेगारीवर निर्णायक कारवाई करणे आवश्यक असल्याचे दाते यांनी नमूद केले.
अमली पदार्थांची तस्करी, छुप्या पद्धतीने होणारी विक्री, तसेच गुंड टोळ्यांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी संबंधित आयुक्त आणि अधीक्षकांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध सुरू असलेल्या कारवायांची माहिती सादर केली.
दरम्यान, शनिवारी (७ फेब्रुवारी) होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याचे निर्देश दाते यांनी दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर सतर्क राहण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या