१ जानेवारी २०२६ अर्हता दिनांक; ९ फेब्रुवारीला प्रारूप यादी प्रसिद्ध – एप्रिल-मे मध्ये मतदानाची शक्यता
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात (By-elections loom in Baramati; Voter list update begins) पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रशासकीय हालचाली सुरू करत विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या एप्रिल–मे महिन्यात या मतदारसंघात मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या महिन्यात (दि. २८ जानेवारी २०२६) विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. एखादी विधानसभा जागा रिक्त झाल्यास सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानुसार आयोगाने तयारीला सुरुवात केली असून मतदार यादी अचूक आणि अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. आयोगाने १ जानेवारी २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित केला आहे. या तारखेपर्यंत १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना नाव नोंदवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदारसंघाची एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळून यादी अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न असेल. प्रारूप यादीत नागरिकांना आपले नाव तपासता येईल. नाव नसल्यास किंवा तपशीलात दुरुस्ती असल्यास विहित मुदतीत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे सर्व अर्ज निकाली काढल्यानंतर मार्च महिन्यात अंतिम मतदार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. बारामती मतदारसंघातील राजकीय घडामोडींना या प्रक्रियेमुळे आता अधिक वेग येणार असल्याचे मानले जात आहे.
—चौकट—
अजित पवारांच्या जागी कोणाला उमेदवारी
बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक लढवू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.