पुणे : शहरात घरफोड्यांच्या घटना थांबायचे नाव घेत नसताना येवलेवाडी तसेच मुंढवा भागात चोरट्यांनी पुन्हा (Two house burglaries in the city; Property worth Rs. 46 lakhs looted) पोलिसांना आव्हान देत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरांचे कुलूप तोडून तब्बल ४६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील नागरिक करत आहेत.
याप्रकरणी जिजाप्पा देवकाते (वय ६३) यांनी येवलेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान घडली. देवकाते हे कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर येथे विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ राहतात. ते कुटुंबासह बाहेर गेले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाट आणि ड्रॉवर कटावणीने उचकटून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ४८ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ६ फेब्रुवारी रोजी घरी परतल्यानंतर घरफोडी उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दुसरी घटना मुंढवा भागातील राजश्री शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाजवळील गजानन महाराज हाऊसिंग सोसायटीत घडली. ५ ते ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज त्यांनी लंपास केला. याप्रकरणी श्रेणिक विनोद कासवा (वय ४०) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुराव्यांची छाननी केली जात आहे.