पुणे, प्रतिनिधी : पुणे महापालिकेत राज्यभरात सर्वाधिक लीडने निवडून आलेले भाजपचे नगरसेवक राघवेंद्र मानकर (Don’t want honorarium, help patients!” Ideal decision by corporator Raghavendra Bappu Mankar) यांनी आणखी एक आदर्श निर्णय घेत नगरसेवकांसाठी संदेश दिला आहे. राजकारण म्हणजे सत्ता नव्हे, तर समाजसेवा हे हे शब्द खरे ठरवत त्यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि सर्व भत्ते स्विकारण्यास नम्रपणे नकार देत ही रक्कम महापौर निधीमध्ये जमा करून ती शहारातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या उपचारांसाठी वापरावी, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्य पुणेकरांमध्येही कौतुकाची लाट पसरली आहे.
राघवेंद्र मानकर हे प्रभाग क्र. २५ (ब) मधून भरघोस तसेच राज्यातील सर्वाधिक मत्ताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपमधील तरुण फळीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. सोमवारी पालिकेत महापौर उप उपमहापौर निवड प्रक्रिया पार पडली. त्यात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार मिळणारे मानधन नाकारले आहे. याबाबत बोलताना मानकर म्हणाले, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नागरिकांनी दिलेल्या संधीचे पैसे घेणे मला योग्य वाटत नाही. हे मानधन जर गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी उपयोगी पडले, तर त्यातून मिळणारे समाधानच माझ्यासाठी मोठे आहे.” अनेक वेळा उपचारांसाठी पैसे नसल्याने गरीब कुटुंबांची होणारी परवड पाहून हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या मानधनातून एखाद्या रुग्णाला औषध, शस्त्रक्रिया किंवा उपचार मिळाले, तर त्यापेक्षा मोठे काम दुसरे कोणते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आजच्या राजकीय वातावरणात मानधनाचा त्याग करून गरजूंना मदतीचा हात देण्याचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.