माजी कर्मचाऱ्याच्या सूडातून सुरक्षा यंत्रणांची धावपळ
पुणे, प्रतिनिधी : हॉटेलच्या माजी कर्मचार्याने सूड भावनेतून देशपातळीवरील सुरक्षा यंत्रणा अन् पुणे पोलिसांची तारांबळ उडवली. हॉटेल मालकाला अद्दल घडविण्यासाठी केलेल्या रागातून मात्र, पुणे पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागला. कारण, दिल्लीतील चांदणी चौक परिसरात बॉम्बस्फोट घडविण्याचा कट पुण्यातून रचला गेल्याची माहिती ८ फेब्रुवारी रोजी एका अनोळखी व्यक्तीने फोनवरून थेट दिल्ली पोलिसांना दिली. या कॉलमुळे दिल्लीपासून पुण्यापर्यंत सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या अन् युद्धपातळीवर तपासाला सुरूवात झाली. मात्र तपासाअंती हा प्रकार सूडातून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुणे पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला.
दिल्ली येथील प्रसिद्ध अशा चांदणी चाैकात गेल्या वर्ष झालेल्या स्फोटाने हादरले होते. तपास यंत्रणांकडून त्याचा तपास अद्याप सुरूच आहे. त्याचदरम्यान, दिल्ली पोलिसांना एका व्यक्तीने थेट फोनकरून बुधवार पेठेतील एका हॉटेलचा मालक स्फोटाच्या कटात सहभागी आहे. त्याला तब्बल २० कोटी रुपये मिळाले असून, त्याच्या घरी स्फोटक साहित्य साठवले असल्याचीही माहिती दिली गेली. या अज्ञात फोनमुळे दिल्ली पोलिस देखील हादरून गेले. तपास यंत्रणांना देखील याची माहिती देत या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दिल्ली पोलिसांनी तातडीने एनआयएला सतर्क केले आणि पुणे पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधला.
आता पुन्हा एकदा दहशतवादी कारवायाचे ‘पुणे कनेक्शन’ समोर आल्याने पुणे पोलिस देखील अर्लट मोडवर आले. तपासाची चक्रे तातडीने फिरली गेली. स्थानिक पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. सायबर पथकाने कॉलचा स्त्रोत शोधून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. काही तासांच्या चौकशीनंतर संपूर्ण प्रकार उलगडला झाला.
रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचे पुणे कनेक्शन उघड; वारजे माळवाडी पोलिसांकडून पाच जण अटकेत
चौकशीत समोर आले की, कॉल करणारी व्यक्ती कोविड काळात संबंधित हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. विचित्र वर्तनामुळे त्याला नोकरीवरून काढले होते. त्याच रागातून हॉटेल मालकाला अडचणीत आणण्यासाठी बनावट माहिती देण्यात आल्याचे उघड झाले. संबंधित व्यक्तीची मानसिक स्थितीही स्थिर नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारे दिशाभूल करणारे फोन केल्याच्या तक्रारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही तास देशातील सुरक्षा यंत्रणांना धावपळ करायला लावणारा कथित ‘कट’ अखेर खोटा असल्याचे स्पष्ट झाले.