पुणे, प्रतिनिधी
शहराला काळीमा लावणार्या त्या पुतण्याला सात वर्षांनी न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. नराधम पुतण्याने आजारी असलेल्या ७५ वर्षाच्या काकूला दवाखान्यातून परत घेऊन येताना तिच्यावर बलात्कार केला होता. ५८ वर्षांच्या नराधम (Nephew rapes elderly aunt; Nephew sentenced to 10 years in prison) या पुतण्याला पुणे न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीसोबतच १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी हा निकाल दिला. आरोपीने दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
याप्रकरणी वयोवृद्ध पीडितेने पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपीविरोधात बलात्कार व धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १८ सप्टेंबर २०१९ रोजी मुळशी तालुक्यात पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. तिने आरडाओरडा करू नये, यासाठी तिच्या तोंडात आरोपीने स्वतःचा रूमाल कोंबला होता. घटनास्थळी पंचनाम्यात सापडलेला हा रूमाल महत्त्वाचा पुरावा ठरला.
पीडित आपल्या सून व नातवासमवेत गावात राहात होती. घटनेच्या दिवशी सकाळी प्रकृती खालावल्याने तिने आरोपी चुलत पुतण्याला डॉक्टरांकडे नेण्यास सांगितले. आरोपी पीडितेला दुचाकीवरून डॉक्टरांकडे घेऊन गेला. तिथे इंजेक्शन व औषधे घेतल्यानंतर घरी परत येताना, आरोपीने तिला एका बांधकामाच्या ठिकाणी नेले. तिथे तिच्या तोंडात रूमाल कोंबून बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित वृद्धेचा मृत्यू झाला. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेचा मुलगा, सून, तपास अधिकारी व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. वैद्यकीय अहवालात पीडितेच्या शरीरावर बलात्कार केल्याच्या जखमा आढळल्या; तसेच आरोपीच्या डाव्या गुडघ्याला जखम झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावर पीडितेचा चष्मा, औषधांच्या गोळ्या आणि आरोपीचा रुमाल सापडला. याबाबत, आरोपीला स्पष्टीकरण देता आले नाही. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असून, त्याने गंभीर गुन्हा केला आहे. समाजात योग्य संदेश देण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत सरकार पक्षाने आपला खटला निःसंशयपणे सिद्ध केल्याचे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.