पुणे, प्रतिनिधी : पुणे पोलिसांनी आतापर्यंत सर्वात मोठे सर्च ऑपरेशन राबवून शहरातील बुधवार पेठेत चालणाऱ्या अवैध गोष्टींवर कारवाई केली आहे.(Pune Police’s biggest search operation; Historic operation in Budhwar Peth) धक्कादायक म्हणजे, अमली पदार्थांचा पुरवठा आणि बेकायदेशीर कृत्यांबाबत मिळालेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मध्यरात्री मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान काही अल्पवयीन मुलींची सुटका तसेच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले. तर, चरस आणि नशेची इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ७०० पोलिसांचा फौजफाटा चार तास बुधवार पेठेत सर्च ऑपरेशन मोहिम राबवित होता.
पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईबाबत माहिती दिली. या वेळी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये ४१ इमारतींची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, यावेळी या भागात आलेल्या काही आंबटशौकीनांसह ७०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार बांग्लादेशी अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष सूचना दिल्यानंतर ही धडक मोहीम राबवण्यात आली. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणात फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या भागातील हालचालींवर अधिक लक्ष ठेवण्यात येत होते. माहितीनुसार, बेकायदेशीररीत्या भारतात आलेल्या महिलांकडून देहविक्री करवून घेतली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही झाडाझडती घेण्यात आली.
मंगळवारी रात्री सुमारे बारा वाजता दोन पोलीस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक आणि सुमारे ६०० पोलिसांचा फौजफाटा अचानक परिसरात दाखल झाला. पहाटे चारपर्यंत गल्लीबोळ आणि इमारतींची तपासणी सुरू होती. पायी पेट्रोलिंग करत अनेकांची चौकशी करण्यात आली.
कारवाईदरम्यान ७ ग्रॅम चरस तसेच नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात अमली पदार्थ पुरवठादारांपर्यंत तपास वाढवला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींना पुण्यात कोणी आणले, त्यांना या कामासाठी कोणी भाग पाडले, याचा तपास सुरू आहे.