पुणे, प्रतिनिधी : काँग्रेस भवनाजवळ रविवारी झालेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीप्रकरणी अखेर भाजप तसेच काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.(Stone pelting protest case; Crimes against Congress-BJP leaders and activists) परस्परविरोधी तक्रारींवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झाले असून अधिक तपास सुरू आहे. दगडफेकीत पाच कार्यकर्त्यांसह दोन पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले.
काँग्रेसच्या प्राची दुधाने (वय ४२) यांच्या तक्रारीवरून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(२), १८९(३), ३२४(४), १९१(२) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७(१)(३), १३५, ११२, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुधाने यांच्या तक्रारीनुसार, घाटे व मोहोळ हे कार्यकर्त्यांसह काँग्रेस भवन परिसरात आले आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करत दगडफेक केली. यात तीन जण जखमी झाले तसेच काही वाहनांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपचे पुनीत जोशी यांच्या तक्रारीवरून अरविंद शिंदे, अक्षय जैन, गौरव विजय बाळंदे आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध याच कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजपचे आंदोलन संपल्यानंतर मोर्चा परत जात असताना काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.आंदोलन का झाले ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले होते. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वाद वाढत गेला आणि झटापटीनंतर दगडफेक झाली. या घटनेत काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी झाले होते. पोलिस आणि पत्रकारांनाही किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी घेत गुन्हे नोंद केले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.