पुणे, प्रतिनिधी : पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही जंगली महाराज रस्त्यावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या एका संघटनेच्या २३ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Crime against 23 people protesting in support of Palestine in Pune ) संबंधित कार्यकर्त्यांना काही वेळ ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर सोडून देण्यात आले.
महापालिकेच्या वतीने दोन दिवस (शनिवार-रविवारी) जंगली महाराज रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी उद्यान परिसरात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी एकत्र येत येथे घोषणाबाजी केली. तसेच आंदोलन केले. पण, पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलीस हवालदार नलिन येरुणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.
परवानगी नाकारण्यामागचे कारण महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यान येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव आंदोलनास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कार्यकर्त्यांचा आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य इस्त्राईल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टिनी नागरिकांच्या मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आंदोलन आयोजित केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करणार असतानाही पोलिसांनी परवानगी नाकारून ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला.