पुणे, प्रतिनिधी : व्याजाने पैसे घेतलेल्या महिलेला धमकावून एका दाम्पत्याने तिला प्रतिष्ठित तसेच नामांकित असलेल्या बारामती येथील एका उद्योजकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगत खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (The couple who trapped them in the trap are behind bars; The type of torture is also revealed)या दाम्पत्याने अनेक व्यावसायिक तसेच उद्योजकांना जाळ्यात अडकविल्याची शक्यता आहे. यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. धक्कादायक म्हणजे, त्याच महिलेवर अत्याचार केल्याचाही समोर आला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रताप रमेश जाधव (वय ४५) आणि पल्लवी प्रताप जाधव (वय २८, रा. भिंताडेनगर, आंबेगाव, कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत २८ वर्षीय पिडीत महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार महिला पतीपासून विभक्त झालेली आहे. ती एकटीच राहत होती. २०२४ मध्ये तिची जाधव दाम्पत्याशी ओळख झाली. नंतर दाम्पत्याने महिलेला त्यांच्या घरी भाड्याने राहण्यास सांगितले. महिलाही त्यांच्याकडे भाड्याने राहू लागली. दरम्यान, या काळात महिलेने आरोपींकडून २ लाख रुपये दरमहा ५ टक्के व्याजदराने घेतले होते. वेळोवेळी या महिलेने व्याजासह मुद्दल असे एकूण ३ लाख ६० हजार रुपये तिने परत केले. मात्र, त्यानंतर देखील आरोपींनी तिला धमकावून अधिक पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. तसेच, २५ ऑगस्ट २०२५ आरोपी प्रताप जाधव याची पत्नी घराबाहेर असताना त्याने महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे. महिलेने पोलिसांकडे जाण्याचा
प्रयत्न केला असता आरोपी दाम्पत्याने तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच, ऑक्टोबर २०२५ मध्ये जाधव दाम्पत्याने बारामतीतील एका उद्योजकाविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यासाठी महिलेवर दबाव आणल्याचा आरोप आहे. खोटी तक्रार केल्यास २० ते २५ लाख रुपये आणि बारामती येथे फ्लॅट देण्याचे आमिष दाखविले. मात्र, महिलेने खोटी तक्रार देण्यास नकार दिला. दरम्यान, आरोपींनी अशाच प्रकारे इतर व्यावसायिक व उद्योजकांना धमकावून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी सखोल तपास करून जाधव दाम्पत्याला अटक केली.पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलिस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी, संदीप आगळे, सागर बोरगे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, मितेश चोरमेले यांनी ही कारवाई केली.
पोलिसांचे आवाहन…
“जाधव दाम्पत्याने जाळ्यात अडकवून अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोपींनी अशा पद्धतीने पैसे उकळले असल्यास नागरिकांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी,” असे आवाहन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी केले आहे.