पुणे, ‘काँग्रेस भवन परिसरात झालेल्या आंदोलन अन् दगडफेकप्रकरणानंतर यापुढील काळात विविध राजकीय पक्षांचे नेते व पक्ष कार्यालयांसमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही’, नसल्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.(Police Commissioner’s big decision after stone pelting protest in Pune)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात पडसाद उमटले आहेत. या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. घटनेत काँग्रेसचे तीन, तसेच भाजपचे दोन असे पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दोन पोलीस कर्मचारी, दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यामध्ये काँग्रेसचे अरविंद शिंदे यांच्यासह इतरांवर तर भाजपच्या धीरज घाटेंसह इतरांवर गुन्हा नोंदवला गेला.
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना यासंदंर्भात विचारले असता त्यांनी ‘काँग्रेस भवन येथील आंदोलन शांतपणे पार पडेल, असा अंदाज होता. घोषणाबाजी केली जाईल, अशी शक्यता होती. आंदोलनस्थळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात होता. मात्र, कार्यकर्त्यांची झटापट झाली आणि दगडफेकीत रुपांतर झाले. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पोलिसांनी त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यापुढील काळात कोणताही पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही’.
जबाबदारी निश्चित करुन कारवाई
काँग्रेस भवन परिसरात भाजपच्या नगरसेविका महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित होत्या. त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ‘पोलिसांकडे आलेल्या तक्रारीचे अवलोकन केले जाईल. तपासातील माहितीनुसार जबाबदारी निश्चित करुन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल ’, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.
पोलीस आयुक्तांनी आरोप फेटाळले
पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित करुन आरोप केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोप फेटाळून लावले. ‘पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली असून, आराेपांमध्ये तथ्य नाही’, असे त्यांनी सांगितले.