– डिसेंबर २०२६ पर्यंत मोठा बदल दिसेल – प्रशासनाचा दावा
पुणे, प्रतिनिधी : पुण्याची वाहतूक व्यवस्था सक्षम, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी महापालिका अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजना राबविणार (Short, medium and long-term measures to improve traffic – Commissioner Naval Kishore Ram) असून डिसेंबर २०२६ पर्यंत शहरातील रस्ते व वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल दिसेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. यासंदंर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महत्वाची माहिती देत ”कमी खर्चात आणि वेळेचे काटेकोर नियोजन करून अल्पकालीन उपाययोजना प्रत्यक्षात आणण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले”.
महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व अभियंत्यांसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम, सभागृहनेते गणेश बिडकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर तसेच आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ अमित परांजपे आणि साकार रोबोटिक्सचे सहसंस्थापक डॉ. मनोज पोचट उपस्थित होते.
एकात्मिक नियोजनावर भर
आयुक्त राम म्हणाले, “कुशल मनुष्यबळ, कायदा-सुव्यवस्था आणि अनुकूल वातावरणामुळे आयटी व जीसीसीसारख्या क्षेत्रांची पुण्यात झपाट्याने वाढ झाली. मात्र नियोजनबद्ध विकासासोबत वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. सध्या शहरातील केवळ ५० टक्के वाहतूक ही पुणेकरांची असून उर्वरित वाहतूक ग्रामीण भागातून शहरामार्गे पुढे जाणारी आहे. त्यामुळे ताण वाढतो. मेट्रो, रिंगरोड आणि मिसिंग लिंकची कामे सुरू असून पुढील पाच वर्षांत ती पूर्ण झाल्यानंतर २०३० नंतर वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असे त्यांनी सांगितले. “मोठ्या निधीपेक्षा एकात्मिक कामाची गरज आहे. रस्ते रुंदीकरण, पथदिव्यांची सुधारणा, फिडर बॉक्सचे नियोजन, अनधिकृत होर्डिंग व अतिक्रमणे हटविणे आणि वॉर्डनिहाय रस्त्यांची दुरुस्ती केल्यास २०२६ अखेरपर्यंत सकारात्मक बदल दिसेल,” असे त्यांनी नमूद केले.
लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाचा वापर
महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, “रिंगरोड, मेट्रो, उड्डाणपूल पूर्ण होण्याची वाट न पाहता उपलब्ध साधनसामग्रीतून वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. वॉर्ड पातळीवर सतर्क कर्मचाऱ्यांनी काम केल्यास अनेक छोट्या समस्या तत्काळ सुटू शकतात. नागरिकांच्या सूचनांचा उपयोग करून तंत्रज्ञानाच्या मदतीने कामांना गती देता येईल.” शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दृकश्राव्य सादरीकरणाद्वारे वाहतुकीची सद्यस्थिती मांडली.
‘३० वर्षांत ३०० टक्के वाढ’
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील म्हणाले, “देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे ३० वर्षांत तब्बल ३०० टक्क्यांनी वाढले आहे. त्या वेगाने पायाभूत सुविधा वाढू शकल्या नाहीत, त्यामुळे वाहतुकीचा ताण निर्माण झाला. तरीही अल्प खर्चातील उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. रस्त्यांचे रिसर्फेसिंग आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही प्रमाणात सुधारणा दिसत आहे.”