पुणे, पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शाळेत सोडण्याची बतावणी करुन अल्पवयीन मुलीवर कारमध्येच नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीतील आहे. ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर (वय २९, रा. पोळ कॉलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीचा आहे. त्याची पीडित मुलीच्या आईशी ओळख होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास अल्पवयीन मुलीला कारने शाळेत सोडतो, असे सांगून तिला नेले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर त्याने कार थांबविली. मुलीला धमकावून बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली.
त्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास उपनिरीक्षक तरडे करत आहेत.