पुणे : प्रतिनिधी, हडपसर परिसरातील राम मनोहर लोहिया उद्यानाजवळील मजुरांच्या वसाहतीत शनिवारी लागलेली भीषण आग ही अपघात नसून जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे.(Youth behind Hadapsar slum fire) या आगीत तब्बल १९ झोपड्या आणि तीन दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने मजूर व त्यांचे कुटुंबीय वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. तरुणाशी वादविवाद झाल्यानंतर त्याने त्याची दुचाकी पेटवली. त्या दुचाकीमुळे झोपड्यांना आग लागल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी समर्थ तुपे (वय २०, रा. हडपसर) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “या प्रकरणी समर्थ तुपे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ३२६ (जाणीवपूर्वक आग लावणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
वादातून पेटली दुचाकी, झोपड्यांपर्यंत पोहोचली आग
पुणे-सोलापूर रस्त्यालगत असलेल्या राम मनोहर लोहिया उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची तात्पुरती वसाहत आहे. या झोपड्या बांबू व पत्र्याच्या साहाय्याने उभारण्यात आल्या आहेत. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास एका झोपडीला आग लागली. घरातील गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्याने आग वेगाने भडकली आणि शेजारील झोपड्यांमध्ये पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक चौकशीत ही आग अपघाती नसल्याचे स्पष्ट झाले. वसाहतीतील एका तरुणाशी झालेल्या वादातून समर्थ तुपे याने त्याची दुचाकी पेटवून दिल्याचे समोर आले. पेट घेतलेल्या दुचाकीची झळ शेजारी उभ्या असलेल्या दोन दुचाकींना बसली आणि त्यानंतर आगीने झोपड्यांना वेढले. काही वेळातच एकापाठोपाठ १९ झोपड्या जळून खाक झाल्या. पोलिसांनी परिसरातील रहिवाशांची चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वादातून दुचाकी पेटविल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.