पुणे, प्रतिनिधी विमानगर भागातील एका स्पावर पोलिस छापा मारण्यासाठी गेल्यानंतर तेथील स्पा मॅनेजरसह मुलीने दुसऱ्या मजल्यावरून (Fearing police, a young woman jumped with a spa manager, the young woman died) उडी मारली. याघटनेत तरुणीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. तर, मॅनेजर जखमी झाला आहे. ‘द रूट्स स्पा’ येथे ही घटना घडली आहे.
हुसेन रेहमान शेख (वय ३९) असे जखमी झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. तर, २७ वर्षीय तरुणीचा गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहितीनुसार, विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाला द रूट्स स्पा याठिकाणी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी स्पा सेंटरवर गेले होते. छापा टाकला आणि कारवाई सुरू असतानाच अटक होण्याच्या भीतीने एका तरुणीने आणि मॅनेजरने खिडकीतून उडी मारली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. उडी मारल्याने तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने पोलिसांनी पोलिस गाडीतून रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. तर, मॅनेजरला पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर विमानगर परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्पा सेंटरच्या इमारतीभोवती मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. स्पा सेंटरचा कारभार, परवाने, कर्मचारी नोंदी तसेच अन्य बाबींची तपासणी सुरू केली आहे.
स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रकारांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई केली होती. घटनेतील मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, घटनेबाबत स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि अन्य संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघाता मृत्यूची नोंद- डीसीपी मुंडे
संबंधित स्पामध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात होता. या प्रकरणी व्यवस्थापक व मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच, महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली जात आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.