– पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप
पुणे, प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार (Congress spokesperson Hanumant Pawar beaten up by Hindutva activists, case registered) यांना सोमवारी पुण्यातील मित्रमंडळ चौकातील एका माध्यम संस्थेच्या कार्यालयाबाहेर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही मारहाण केली. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान झालेल्या शाब्दिक वादाचेच हे पुढील रूप असल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी हनुमंत पवार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत तुषार दामगुडे यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
माहितीनुसार, हनुमंत पवार हे सोमवारी मित्रमंडळ चौकातील एका वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या चर्चेसाठी गेले होते. तेथील कार्यक्रम संपल्यानंतर ते फोनवर बोलत कार्यालयाबाहेर पडले. तेव्हा गेटसमोर तुषार दामगुडे आणि त्यांच्या सोबत तीन ते चार जण उभे होते. त्यांनी पवार यांना बोलावून घेतल्याचे दिसत आहे. त्यानंतर शाब्दिक वाद होऊन चौघांनी मिळून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पवार यांनी तक्रारीत पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल झाले. या घटनेमुळे शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
“पूर्वनियोजित हल्ला” : हनुमंत पवार
“दामगुडे यांनी हा हल्ला पूर्वनियोजित केला. वार्तालाप संपताच त्यांनी कार्यालयाबाहेर आधीच लोकांना बोलावून ठेवले होते. मी फोनवर बोलत बाहेर पडत असताना ‘तुला जिवंत राहायचे आहे ना? हे बघ पिस्तुल’ असे म्हणत धमकावले. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यानंतर दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली.”
हनुमंत पवार, प्रवक्ते, काँग्रेस
“शिवीगाळीमुळे संताप” : तुषार दामगुडे
“यापूर्वी एका अन्य खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पवार यांनी मला शिवीगाळ केली होती. आईवरून शिवीगाळ केल्याने मी संतापलो होतो. मला नक्षलवाद्यांकडून धोका असल्याने मी परवानाधारक पिस्तूल बाळगतो. पवार यांनी मला नक्षलवाद्यांविरोधातील केस मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.”
तुषार दामगुडे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते