पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देणार असल्याचा इमेल (Bomb threat to passport office; Checks conducted at three places in Pune!) आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी युद्धपातळीवर शहरातील तीन कार्यालयात तपासणी मोहिम राबविली. त्यानंतर हा इमेल बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान याप्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर तपास सुरू आहे. बाणेर येथील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल गुरुवारी सकाळी प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयच्या मदतीने आरडीएक्स आणि आयईडी स्फोटके प्लांट केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाच्या सखोल तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नेमकी काय घडली घटना?
पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर गुरुवारी सकाळी धमकीचा मेल प्राप्त झाला. मेलमध्ये पुण्यातील पासपोर्ट कार्यालयांमध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याचा उल्लेख होता. मात्र, शहरातील तीन कार्यालयांपैकी नेमके कोणते कार्यालय लक्ष्य करण्यात आले आहे याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नव्हती. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
तीन ठिकाणी कसून तपासणी
धमकी मिळताच पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले. पथकांनी बाणेर, मुंढवा आणि सेनापती बापट रस्ता येथील पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीतील सर्व मजले, कार्यालयीन कक्ष तसेच पार्किंग परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही.
गुन्हा नोंद, तपास सुरू
धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेल्या ई-मेल आयडीचा तांत्रिक मागोवा सायबर पोलिस घेत आहेत. संबंधित व्यक्तीचा शोध सुरू असून लवकरच यामागील सूत्रधाराचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
धमकीमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.