पुणे, प्रतिनिधी
सायबर चोरट्यांनी शेअर्स आणि आयपीओमध्ये सवलतीच्या दरात गुंतवणूक करून (Senior citizen cheated of Rs 1.49 crore online with the lure of shares-IPO investment) मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल कोटी ४९ लाख ३३ हजार १५२ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
माहितीनुसार, तक्रारदार हे खराडी येथे राहतात. त्यांच्याशी सायबर चोरट्यांनी संपर्क साधत त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर : शेअर्स आणि आयपीओमध्ये कमी दरात गुंतवणूक खात्रीशीर, अलॉटमेंट तसेच मोठा व हमखास नफा अशी आमिषे दाखवण्यात आली. त्यांना काही बनावट नफ्याचे आकडे दाखवले आरोपींनी एका ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून गुंतवणुकीवर मोठा नफा मिळाल्याचे बनावट आकडे दाखवून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला. यानंतर विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.
परतावा न देता रक्कम लंपास
२० जुलै २०२५ ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपींनी एकूण १,४९,३३,१५२ रक्कम जमा करून घेतली. मात्र कोणताही परतावा न देता आरोपींनी ती रक्कम अपहार केल्याचे समोर आले आहे.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांकडून खालील बाबींचा तपास सुरू आहे :
व्हॉट्सॲप ग्रुप अॅडमिन
वापरण्यात आलेली बँक खाती
संबंधित मोबाईल क्रमांक
डिजिटल व्यवहार
तांत्रिक विश्लेषणासह डिजिटल पुरावे संकलित केले जात आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
गुंतवणुकीसंदर्भात सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.