- पोलिसांच्या कारवाईने पुणेकरांमध्ये समाधान
पुणे, शहरातील प्रसिद्ध असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रस्ता (एफसी रोड) आणि जंगली महाराज रोड (जे.एम रोड) येथे पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डेक्कन पोलिसांनी (Pune Police’s major action; Crimes against 40 hawkers on FC and JM roads) या दोन्ही प्रमुख रस्त्यावरील पदपथावर गॅस शेगडी वापरून अन्नपदार्थ विकणार्या तब्बल ४० फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनी समाधन व्यक्त केले आहे. संबंधित परिसर नेहमीच विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांच्या वर्दळीचा असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
फर्ग्युसन रोड कायम वर्दळीचा आहे. मोठी गर्दी देखील असते. विद्यार्थी वर्ग तसेच खरेदीसाठी तरुणी मोठ्या प्रमाणात असतात. तर व्हीआयपी व्यक्ती येथून येत जात असतात. या रस्त्याच्या मोठ्या संख्येने विक्रेते वडा पाव, अंडी भुर्जी आणि चायनीज पदार्थांची व्रिकी करतात. अनेक विक्रेते कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन न करता उघड्यावर गॅस सिलिंडर आणि शेगडी वापरत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या .गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे गॅस सिलिंडर वापरल्याने अपघात होऊ शकतात. गॅस गळती किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्यास मोठी आपत्ती घडू शकते. यामुळे पोलिसांनी कारवाई केली.
बेकायदेशीर व्यावसाय
पदपथावर चालणार्या पादचार्यांच्या अगदी जवळ गॅस शेगडी पेटवल्या जात होत्या. त्यामुळे पादचार्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपाययोजनांशिवाय सार्वजनिक ठिकाणी असे व्यवसाय चालवणे बेकायदेशीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
डेक्कन पोलिसांनी रस्त्यावरील ४० विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना नोटिसा बजावल्या असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक गिरीश निंबाळकर यांनी दिली आहे. ही मोहीम पदपथावर अतिक्रमण करणार्या आणि धोकादायक पद्धतीने अन्न विकणार्यांविरूद्ध राबविण्यात येत असून, भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.