पुणे : रस्त्यांवर कर्णकर्कश अन् ‘फटाक-फटाक’ आवाज काढणाऱ्या मॉडीफाय सायलेन्सरवर शहर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.(Pune Police bulldozes firecracker silencers – action taken against 2,822 vehicles in the city, fined Rs 28 lakhs) पोलिसांनी मोहीम राबवत गेल्या दोन महिन्यात तब्बल २,८२२ वाहनांवर कारवाई केली. यापैकी ९०० मॉडीफाय सायलेन्सर जप्त करून येरवडा येथील कार्यालयात त्यांच्यावर बुलडोझर चालवत निकामी करण्यात आले. या मोहिमेतून आतापर्यंत २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शहरात विशेषतः तरुणांमध्ये बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. नंतर पोलिसांनी सातत्याने मोहिम राबवत कारवाई सुरू केली. हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन, भारती विद्यापीठ आदी भागांत विशेष नाकाबंदी व तपासणी करण्यात आली.
दंड आणि पुढील कारवाई
पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये तर पुनरावृत्ती झाल्यास २ हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. जप्त सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत यासाठी त्यांचा नाश करण्यात आला. तसेच वाहनधारकांना मॉडीफाय सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. पुढील काळातही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कारवाई दृष्टिक्षेपात
एकूण कारवाई: २,८२२ वाहने
जप्त सायलेन्सर: ९००
वसूल दंड: २८,१७,०००