पुणे, प्रतिनिधी : कल्याणीनगर येथील राज्यभरात गाजलेल्या पोर्शे अपघात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात घडलेल्या (Supreme Court grants bail to Dr. Ajay Taware in Kalyaninagar Porsche accident case) रक्तनमुना फेरफार प्रकरणातील ससून रुग्णालयाचा माजी फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. अजय तावरे याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
दि. १९ मे २०२४ रोजी पहाटे कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलाने वेगात चालवलेल्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये एका तरुणीसह दोघा आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप झाला होता. सुरुवातीला बाल न्यायालयाने अल्पवयीन आरोपी असलेल्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास दिलेली शिक्षा देशभर चर्चेचा विषय ठरली. तर दुसरीकडे पुढील तपासात रक्तनमुने बदलल्याचा गंभीर आरोप समोर आला. मद्यप्राशनाचे पुरावे लपवण्यासाठी संगनमत झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. जुलै २०२४ मध्ये दाखल आरोपपत्रात पुरावे नष्ट करण्यासाठी कट रचल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात डॉ. तावरे यांच्यावरही सहभागाचा आरोप ठेवण्यात आला होता. मे २०२४ पासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
समानता तत्त्वावर जामीन
मुंबई उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२५ मध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपीलमध्ये इतर सहआरोपींना आधीच जामीन मिळाल्याचा मुद्दा मांडण्यात आला. ‘समता तत्त्वा’चा आधार घेत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.
जामिनाच्या अटी
खटल्यात पूर्ण सहकार्य करणे
साक्षीदारांशी संपर्क न साधणे
अटींचा गैरवापर न करणे
अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जामीन मिळालेले आरोपी
डॉ. अजय तावरे, अमर गायकवाड, आशपाक मकानदार, मागील सीटवरील अल्पवयीन, आशिष मित्तल, शिवानी अग्रवाल, अल्पवयीन चालक
अद्याप कारागृहात
विशाल अग्रवाल (बिल्डर), डॉ. श्रीहरी हळनोर, अतुल घटकांबळे