पुणे, प्रतिनिधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सन २०२६) घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी (Two opportunities for CET entrance exam; registrations increase drastically) इंजिनियरिंग, टेक्नॉलॉजी, फार्मसी, बी. प्लॅनिंग, एम. प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि ॲग्रीकल्चर एज्युकेशन या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या एमएचटी सीईटी पीसीएम समूह आणि पीसीबी समूह सीईटी प्रवेश नोंदणी दोनवेळा संधी दिल्याने नोंदणीत वाढ झाली आहे. दरम्यान, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संपली असून, यावर्षी प्रथमच पीसीएम आणि पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्ही संधीमुळे यंदा ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार आहेत. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जामध्ये जर काही दुरुस्त्या असतील तर त्यासाठी दिनांक ५ ते ७ मार्च दरम्यान ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पीसीएम व पीसीबी समूहाच्या या दोन्ही सीईटीसाठी पहिल्या संधीसाठी ७ लाख ५५ हजार ०२९ विद्यार्थ्याची नोंदणी केली असून दोन्ही सीईटीसाठी दुसऱ्या संधीची नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८७ हजार ५८१ आहे. दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ५१० विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
अर्जातील दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध
विद्यार्थांकडून अर्ज भरताना अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दुरुस्तीची सुविधा दिनांक ५ ते ७ मार्च दरम्यान उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात त्याचे नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग, पीसीएम किंवा पीसीबी समूह समाविष्ट करणे, दुसरी संधी समाविष्ट करणे यामध्ये दुरुस्ती व बदल करण्याची सुविधा देण्यात येत आहे.
दोन्ही संधीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा
एमएचटी सीईटी (पीसीएम समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा ११ ते १९ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा दि. १४ ते १७ मे दरम्यान होणार आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा दि. २१ ते २६ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १० ते ११ मे दरम्यान होणार आहे. हि सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाईन घेतल्या जातील.
सीईटी प्रवेश नोंदणी आकडेवारी
सीईटी -पहिली संधी-दुसरी संधी-दोन्ही संधी
एमएचटी पीसीएम समूह-४,७४,६५६ – २,८६,३२५ -७,६०,९८१
एमएचटी पीसीबी समूह-२,८०,३७३ -१,०१,२५६ -३,८१,६२९
एकूण -७ ,४०,९०६ -३,८३,९८१ -११,४२,६१०