पुणे, प्रतिनिधी : बारामती तालुक्यात तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांच्या नावावर शेतकऱ्याकडून लाच मागणाऱ्या मध्यस्थाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. (ACB catches middleman who demanded bribe in the name of Talathi-Mandal officers)बारामती-नीरा रस्त्यावरील खंडोबाची वाडी येथे १५ हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.
सोमनाथ संपत महानवर (वय ३५, रा. गडदरवाडी, खंडोबाची वाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थाचे नाव आहे. त्याच्याविरोधात बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार शेतकरी असून, त्यांची बारामती तालुक्यातील निंबूत येथे सहा गुंठे जमीन आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी झाल्यानंतर फाळणी करून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तहसीलदारांकडून पत्र देण्यात आले होते.
त्यानंतर तक्रारदार निंबूत येथील तलाठी कार्यालयात गेले असता तेथे वावरणाऱ्या सोमनाथ महानवरने सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी जयश्री तनपुरे आणि मंडल अधिकारी मोहिते यांच्या नावावर सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. पडताळणीदरम्यान महानवरने संबंधित अधिकाऱ्यांच्या नावावर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ३ मार्च रोजी महानवरने तक्रारदाराला ‘चार गुंठे जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यात आली असून पैसे पाठवा’ असा संदेश पाठविला. यानंतर एसीबीने सापळा रचला. बुधवारी (४ मार्च) बारामती-नीरा रस्त्यावरील खंडोबाची वाडी येथे तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारताना महानवरला रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत महानवर हा तलाठी कार्यालयाचा कर्मचारी नसल्याचेही स्पष्ट झाले.