पुणे, प्रतिनिधी : स्वारगेटमध्ये हवेत गोळीबार करून दहशत माजवल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी मार्केटयार्डमधील वखार महामंडळ परिसरात तरुणावर गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.(Anti-Extortion Squad action against ‘those’ duo in the shooting case;) आरोपींना नांदेड सिटीतून ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आलीआहे.
साहिल महेंद्रसिंग चव्हाण आणि बालाजी रामजी उमाप (दोघेही रा. स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गोळीबारात मोजेश शेखापुरे हा तरुण जखमी झाला होता. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी काही अल्पवयीन मुलांनी हवेत गोळीबार करून परिसरात दहशत माजवली होती. टोळ्यांमधील वादातून हा प्रकार घडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी या घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपींनी मार्केटयार्ड परिसरातील वखार महामंडळाजवळ मोजेश शेखापुरे याच्यावर गोळीबार केला. या घटनेत तो जखमी झाला होता.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिस हवालदार दयानंद तेलंगे आणि पोलिस अमलदार मयूर भोक्रे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेटजवळ जोगेश्वरी परिसराच्या मागील बाजूस लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने परिसरात चारही बाजूंनी सापळा रचत छापा टाकला आणि दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच आरोपींकडून चौकशी करून गुन्ह्यात वापरलेली सुजुकी बर्गमन दुचाकी ही जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे आणि त्यांच्या पथकाने केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.