पुणे; कौटुंबिक जबाबदारी त्यासोबतच नोकरी अथवा व्यवसाय करत असताना महिलांचे आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे, असा महत्वाचा संदेश देत महिला दिनाचे औचित्य साधून ओरायन फिटनेसतर्फे फिटनेस स्पर्धेतून महिला दिन साजरा करण्यात आला.(Orion Fitness initiative; Health awareness message on Women’s Day)
सिंहगड रस्त्यावरील आनंद विहार कॉलनीत रविवारी (दि. ८ मार्च) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका ज्योतीताई गोसावी, श्रावणीताई जगताप, वृंदाताई जगताप तसेच डॉ. स्नेहल जोशी, ओरायन फिटनेसच्या प्रमुख दिप्ती आंबेकर उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये स्कॉट्स, सीट अप्स ,बॉडी मोबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी तसेच स्टेप्स अप-डाऊन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचा समावेश होता. विविध वयोगटातील महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
डॉ. स्नेहल जोशी यांनी ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांमध्ये वयानुसार होणारे शारीरिक व मानसिक बदल, त्याची जाणीव ठेवण्याचे महत्त्व तसेच त्यावर सहज सोपे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ज्योतीताई गोसावी यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत नगरसेविकेची जबाबदारी पार पाडताना कुटुंबातील महिला सदस्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करत हा महिला दिन त्यांना समर्पित केला. तसेच महिलांनी आत्मनिर्भर व आत्मविश्वासू बनावे, असे आवाहन त्यांनी केले. श्रावणी जगताप यांनी महिलांमध्ये असलेली ताकद, सुप्त गुण तसेच एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्यांची क्षमता याबद्दल सर्व महिलांचे कौतुक केले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ पदके तसेच ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता राऊत व स्वाती कुमठेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीप्ती आंबेकर यांनी केले.