पुणे : प्रतिनिधी, पुण्याच्या प्रगतीचा महामार्ग म्हणून पाहिल्या जाणार्या मेट्रो प्रकल्पाला विविध अडचणी येत आहेत. बहुप्रतिक्षित हिंजेवडी- शिवाजीनगर मेट्रो काॅरीडओअर प्रकल्पाच्या कामाला पुन्हा एकदा (The much-awaited Hinjewadi-Shivajinagar Metro Corridor project will be delayed) विलंब होण्याची शक्यता आहे. २३ किलोमीटर लांबीचा हा तिसरा मेट्रो मार्ग मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र आता संपूर्ण मार्गावर प्रवासी सेवा जून आणि जुलैपर्यंत दोन टप्प्यात सुरु होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पुण्यात मेट्रो भवनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
हिंजेवडी- शिवाजीनगर मेट्रो काॅरीडओअर पीएमआरडीएच्या वतीने टाटा ग्रुपमार्फत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) पद्धतीत विकसित केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या या मार्गाचे सुमारे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करून एप्रिलपासून चाचणी धावणीनंतर मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार होता. मात्र अद्याप काही स्थानकांवरील काम प्रलंबित असल्यामुळे अंतिम टप्प्यातील कामे सुरू आहेत.
२३ पैकी १३ स्थानके पूर्ण
या मार्गावरील २३ स्थानकांपैकी १३ स्थानके पूर्ण झाली असून ती मान ते MITCON इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या दरम्यान आहेत. उर्वरित स्थानकांवर बांधकाम आणि अंतिम सजावटीची कामे सुरू आहेत. सुमारे १५ ते १७ स्थानके ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचे सांगितले जात असून उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण मार्गावर चाचणी धावणी (ट्रायल रन) सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी कंत्राटदाराकडून संचालनासाठी तयारी झाल्याची अधिकृत पुष्टी आणि आवश्यक परवानग्या मिळणे गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करणे कठीण काही भागात टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याबाबत चर्चा झाली असली तरी तज्ज्ञांच्या मते PPP पद्धतीतील प्रकल्पात अर्धवट मार्गावर सेवा सुरू करणे आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड ठरते. परिवहन नियोजन तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण मार्गावर सेवा सुरू करून जर काही स्थानकांची कामे पूर्ण नसतील तर ती तात्पुरती बंद ठेवणे हा अधिक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो.
पुण्यातील मेट्रोची तिसरी लाईनवरील मेट्रो स्टेशनचे काम अपूर्ण आहे. या मार्गाची दोन टप्प्यात सेवा सुरु केली जाईल. त्यात मे मध्ये ११ किमीचा पहिला टप्पा तर दुसरा १२ किमीचा दुसरा टप्पा जूनमध्ये सुरु होईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.