पुणे, पुण्यात आणखी एक वैष्णवी आत्महत्याप्रकरण उजेडात आले असून, सासरकडून वारंवार होणारी मारहाणी व पैशांच्या मागणीला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या (Another ‘Vaishnavi’ commits suicide in Pune – Crime against husband and in-laws) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील नगर रस्त्यावर असलेल्या लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा रोष व्यक्त केला जात आहे.
वैष्णवी जामकर/लाटे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्ररकरणी गंगाबाई अशोक जामकर (वय ४८, रा. टडगावगुंडा, ता. जि. बीड) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार यशवंत शिवनाथ लाटे (वय २८), सखुबाई शिवनाथ लाटे (वय ५०), शिवनाथ महादेव लाटे (वय ५५) आणि सुरज शिवनाथ लाटे (सर्व रा. गोकुळ पार्क, बकोरी रस्ता, लोणीकंद) यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या मुळच्या बीड जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या मुलीचा आरोपी यशवंत लाटे याच्याशी आठ महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. रिती रिवाजाने हा विवाह लाटे कुटूंबाने लावून दिला होता. मात्र, विवाहानंतर आरोपी पती यशवंत लाटे हा वारंवार मारहाण करून शिवीगाळ करत असे. तसेच, पैशांची मागणी करत मानसिक छळ करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या छळात सासू सखुबाई लाटे, सासरे शिवनाथ लाटे आणि दीर सुरज लाटे यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार ७ मे २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह हुंडा प्रतिबंध अधिनियम १९६१ च्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात ाले आहे.