– कोंढवा, येरवडा, काळेपडळसह प्रमुख भागांमध्ये ड्रग्ज प्रकरणे अधिक
– प्रत्येक ठाण्यात ‘नार्कोटिक्स सेल’ स्थापन करण्याचे आदेश
पुणे | प्रतिनिधी, शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतानाच एका अंतर्गत विश्लेषणातून (These five police stations in Pune are among the ‘top’ in drug cases; Police Commissioner will keep a special eye on them) धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थांची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली असून, आणखी १७ ठाण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व्यवहार उघडकीस येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार कोंढवा, लक्ष्मीनगर, येरवडा, काळेपडळ, खडक आणि लोणी काळभोर ही ठाणी अमली पदार्थप्रकरणात आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना विशेष सूचना देत कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
२२ पोलिस ठाण्यांवर विशेष लक्ष
शहरातील एकूण २२ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या बैठकीत ड्रग्जविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले. केवळ कारवाईवर भर न देता ड्रग्ज पुरवठा साखळीचा मूळापर्यंत शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वतंत्र ‘नार्कोटिक्स सेल’ची स्थापना
प्रत्येक संबंधित पोलिस ठाण्यात स्वतंत्र अँटी-ड्रग्ज पथक (नार्कोटिक्स सेल) स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात दोन अधिकारी आणि कर्मचारी असणार असून, ते ड्रग्जविरोधी गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करतील. तसेच या पथकांना अत्याधुनिक ‘ड्रग्ज अॅनालायझर’ उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
इतर संवेदनशील पोलिस ठाण्यांची यादी
टॉप पाच ठाण्यांव्यतिरिक्त शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, वारजे, पर्वती, मार्केटयार्ड, बाणेर, लष्कर, मुंढवा, वानवडी, हडपसर, लोहगाव, वाघोली, खराडी, लोणीकंद आणि सहकारनगर या भागांतही अमली पदार्थप्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत.
पुरवठा साखळीवर लगाम घालण्याचा प्रयत्न
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, केवळ ड्रग्ज जप्तीवर मर्यादित न राहता, ते कोठून येते, कोणाकडून पुरवठा होतो आणि कोणत्या नेटवर्कद्वारे वितरण केले जाते याचा सखोल तपास केला जाणार आहे. शहरातील ड्रग्ज जाळे मोडीत काढण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.