- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन
पुणे, पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याचा काही भाग (पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए क्षेत्र) समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे (A 200-kilometer metro network will be built in Pune – Chief Minister Devendra Fadnavis) उभारण्याचे नियोजन आहे. छोटो-छोटे टप्पे न करता एकत्रीत नियजोन करुन अडिच ते तीन वर्षात प्रकल्प पूर्ण होईल, याचा विचार करा, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा अजीत पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.
सध्या पुणे शहरात सुमारे ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
२०० किलोमीटरचे मेट्रो जाळे
पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण २०० किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे, सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना त्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे मेट्रो भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज – सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजीत पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले. मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत अशा पद्धतीने विकसित केलेले आहे. महायुती सरकारने रिंग रोड, रुंद रस्ते, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.