पुणे, कामाचाच माणूस, वक्तशीरपणाचा गुण सर्वांनी घ्यावा असा नेता, सर्वसामान्यांसाठी झटणारा कणखर पण संवेदनशील व्यक्तिमत्त्व… घरातील माणूस गेल्याची भावना आहे, अशा शब्दांत पुणेकरांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी जागवत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.(“A man of action…” Pune residents pay their last tribute to ‘Dada’ with tears)
गेल्या आठवड्यात विमान अपघातात निधन झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रंगमंदिराच्या प्रवेशद्वारात त्यांच्या अस्थींचा कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हजारो पुणेकरांनी कलशाला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शोकसभेच्या व्यासपीठावर फक्त अजित पवार यांचे पुष्पहार अर्पण केलेले छायाचित्र ठेवण्यात आले होते. पुणे शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह माजी सनदी व राज्यसेवा अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विठ्ठल मणियार, सिम्बायोसिसचे डॉ. शां. बं. मुजुमदार, विद्याधर अनास्कर, फत्तेचंद रांका, शांताराम जाधव, अभय छाजेड, नागराज मंजुळे, डॉ. सदानंद मोरे, राजेंद्र बाठीया, यु. म. पठाण, मोहन आगाशे, नवल किशोर राम, दिलीप बंड, विद्या येरवडेकर, रुपाली चाकणकर, ब्रिजमोहन पाटील, उल्हास पवार, संजय आवटे आदींनी शब्दांजली वाहिली.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका निवडणुकीचा प्रचार, कोरोना काळातील एकत्रित कामाचा अनुभव तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतील आठवणी सांगितल्या. नेतेगिरीत रमणाऱ्यांपेक्षा कामात रमणारा नेता आज आपल्यात नाही, असे सांगत दिल्लीतील शोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांचा ताकदवान नेता असा उल्लेख केल्याचे त्यांनी नमूद केले.
चंद्रकांत पाटील यांनी, केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे तर ज्यांना अजित पवार यांचा परीसस्पर्श झाला, ते सर्व आज दुःखात आहेत. रांगडे व्यक्तिमत्त्व असले तरी त्यांच्यात विलक्षण संवेदनशीलता होती. दादांशिवाय राज्याचे राजकारण चालणार नाही, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळातील अजित पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी अनुभव सांगत, पेचप्रसंगातून मार्ग काढण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यात होती, असे नमूद करत त्यांच्या स्मारकाबाबतची भूमिका मांडली.
उल्हास पवार यांनी, राजकीय माणसाला वैचारिक बैठक असावी, हे दादांनी आपल्या वागण्यातून सिद्ध केले. ते जमिनीशी जोडलेले, प्रगल्भ आणि सर्वस्पर्शी नेतृत्व होते. त्यांचे जाणे वेदनादायी आहे, अशी भावना व्यक्त केली. शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी दादांच्या विकासाभिमुख विचारांची आठवण करून देत, त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकारण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्याशी थेट संवाद साधणारा नेता आपण गमावला आहे. सोशल मीडियातून तयार होणाऱ्या नेत्यांच्या काळात दादा हे यशवंतराव चव्हाण स्कूलचे शेवटचे विद्यार्थी होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
—
मोहोळांची खास आठवण
महापालिका निवडणुकीदरम्यान झालेली टीका ही राजकीय गरज होती, असे स्पष्ट करत मुरलीधर मोहोळ यांनी एक खास आठवण सांगितली. निवडणुकीच्या काळात तामिळनाडूला जाण्यासाठी विमान उपलब्ध नव्हते. त्यावेळी दादांनी दिवसभरासाठी बुक केलेले विमान तत्काळ मला उपलब्ध करून दिले. राजकारणापलीकडे माणुसकीचे नाते त्यांनी जपले, असे मोहोळ यांनी भावुकपणे सांगितले.