* पुणे पोलिसांकडून नागरिकांना थेट सहभाग
पुणे | प्रतिनिधी
पुणे पोलिसांनी आता कायद्यासोबतच शहर स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवण्यासाठी बेकायदा होर्डिंग्ज आणि बेवारस वाहनांविरोधात (Action against illegal hoardings and abandoned vehicles; Appeal to provide information on ‘PTP’ app) मोठी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनाच सहभागी करून त्यांना ‘पीटीपी’ (Public Traffic Portal) ॲपच्या माध्यमातून थेट बेकायदा होर्डिंगबाबत माहिती कळविण्याचे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. ही माहिती मिळताच पोलिस त्यावर कारवाई करतील असा दावाही त्यांनी केला आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देखील दिला आहे. दरम्यान शहरातील रस्त्यांवर सोडून दिलेली बेवारस वाहनेही ‘पीटीपी’ ॲपद्वारे नोंदवावीत. प्राप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करून ही वाहने हटवली जाणार आहेत.
पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे ‘होर्डिंगमुक्त पुणे’ मोहीम हाती घेतली आहे. पुढील सात दिवस शहरभर धडक कारवाई राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, बेकायदा होर्डिंग, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने आणि बेवारस गाड्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ‘पीटीपी’ ॲपला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत १ लाख ५५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत. या माध्यमातून सुमारे २ लाख ४९ हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्यापैकी पडताळणीनंतर १ लाख ७६ हजार प्रकरणांत चलनाची कारवाई करण्यात आली आहे.
२३ मार्च रोजी वाहतूक शाखेतर्फे ‘पीटीपी’ ॲपवर सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यातील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकाला ५० हजार रुपये, तर पुढील क्रमांकांना २५ हजार, १५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोलिस आयुक्तांचे आवाहन
“‘पीटीपी’ ॲप डाउनलोड करून त्याचा जास्तीत जास्त वापर करा. बेकायदा होर्डिंग, वाहतुकीचे उल्लंघन आणि रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात माहिती द्या; आम्ही कडक कारवाई करू,” असे स्पष्ट आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.