– सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार
पुणे, प्रतिनिधी
बारामती येथे झालेल्या विमान अपघातानंतर दाखल करण्यात आलेल्या अपघाती (Baramati plane crash case: CID investigation is underway properly – ADG Sunil Ramanand) अकस्मात मृत्यू (AD) प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. हा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे वर्ग करण्यासाठी राज्य सरकारने पत्रव्यवहार केला असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, अपघातामध्ये कोणताही घातपात झाला का?, गुन्हेगारी कृत्याचा कोणताही अंश आहे का? आणि क्रिमिनल निग्लिजन्स (गंभीर निष्काळजीपणा) झाला का? या तीन मुद्यांवर तपास सुरू असल्याचेही रामानंद यांनी सांगितले.
गुरूवारी अप्पर पोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य गुन्हे अन्वेषण कार्यालयात ही पत्रकार परिशद पार पडली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक (सीआयडी) सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक (सीआयडी पुणे) पी. आर. पाटील व पोलिस अधीक्षक (सीआयडी मुंबई-कोकण विभाग) प्रशांत वागुंडे उपस्थित होते.
ते म्हणाले, तपासात विविध यंत्रणांचे सहकार्य घेतले जात आहे. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तसेच एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि सीआयडी यांच्यात समन्वय ठेवून तपास सुरू आहे. एएआयबीचा अंतिम निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
सीबीआयकडे तपास सोपविण्याची प्रक्रिया सुरू
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपविण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती रामानंद यांनी दिली. सीआयडीने आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पुरावे गोळा केले असून आणखी काही महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
संवेदनशील प्रश्नांवर मौन
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे का, ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे का यासारख्या संवेदनशील प्रश्नांवर रामानंद यांनी उत्तर देणे टाळले.