पुणे, प्रतिनिधी
मद्यपिऊन वाहन चालविणाऱ्यांवर आता अधिक कठोर पावले पुणे पोलिसांनी उचलली असून, दोन वेळा मद्यपिऊन वाहन चालविताना (ड्रंक अँड ड्राईव्ह) आढळून आल्यास संबंधित चालकाची गाडी थेट जप्त केली जाणार (Be careful if you drive drunk in Pune! Police will seize your vehicle) असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) यांनी दिला आहे. सध्या सुरू असलेल्या कडक कारवाईनंतर नियमभंग सुरूच असल्याने आता पुढचे कठोर पाऊल उचलण्यात येत आहे. तत्पुर्वी मद्यपिऊन वाहन चालविताना पकडलेल्या वाहन चालकांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्गदर्शन केले.
पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेमार्फत शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत समुपदेशन व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात कारवाई झालेल्या वाहन चालकांना मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्तांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट, वेगमर्यादा उल्लंघन अशा प्रकारांवर विशेष लक्ष दिले जात आहे. २०२३ मध्ये ५५०, २०२४ मध्ये सुमारे ३ हजार, तर २०२५ मध्ये तब्बल ६ हजारांहून अधिक वाहन चालक मद्यपिऊन वाहन चालविताना आढळून आले आहेत, ही आकडेवारी गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
कारवाईनंतरही काही नागरिक सुधारत नसल्याने आता ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्या व्यक्तीचा फोटो पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहेत. संबंधित व्यक्तीच्या कार्यालयाला नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून माहिती दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापुढे दोनपेक्षा अधिक वेळा ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये अडकल्यास त्याचे वाहन जप्त करण्याची कारवाई अटळ आहे. “पुणे शहरात मद्यपिऊन वाहन चालविणारा एकही नागरिक आढळता कामा नये,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
चौकट
रस्ते अपघातात ३०० नागरिकांचा मृत्यू
पुण्यात रस्ते अपघातांमध्ये ३०० नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मद्यपिऊन वाहन चालवल्याने झालेल्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. याशिवाय ट्रिपल सीट वाहन चालकांची संख्या वाढत असून, अशा वाहनांवरही थेट जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कल्याणीनगर अपघाताची आठवण
कल्याणीनगर परिसरात २०२४ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात दोन निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या कुटुंबीयांना तब्बल १९ महिने कारागृहात राहावे लागले, याची आठवण करून देत अमितेश कुमार म्हणाले, “एका बाजूला निष्पापांचे प्राण जातात, तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे एक नागरिक म्हणून आपल्या हातून कोणताही गुन्हा घडू नये, याची प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी.