पुणे, प्रतिनिधी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या (BJP-Congress workers clash in Pune..! Police, journalists and workers injured) कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर केलेले आंदोलन चिंघळले. दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत पोलिस, पत्रकारांसह कार्यकर्ते जखमी झाले. प्रथम घोषणाबाजीने परिसर दणाणून गेल्यानंतर अचानक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वातावरण तापत गेले. नंतर अचानक दगडफेक झाल्याची घटना घडली. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. बळाचा वापरकरून पोलिसांना हे आंदोलन शांत करावे लागले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पुणे भाजपच्या वतीने काँग्रेस भवनजवळ रविवारी दुपारी आंदोलन केले. हे आंदोलन सुरू झाले. नुतन महापाैर मंजुषा नागपुरे तसेच भाजप शहरध्यक्ष हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि आपल्या भावना मांडल्या. नंतर मात्र, कार्यकर्ते काँग्रेस भवनाजवळ गेले. हे आंदोलन सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जमा होऊ लागले. भवनात देडशे ते दोनशे कार्यकर्ते जमा झाले. त्यामुळे आंदोलन चिघळेल असे वाटत होते.
दोन्ही बाजूकडून मोठ-मोठ्याने घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर वातावरण तापले गेले. आमने-सामने कार्यकर्ते आल्यानंतर आंदोलनात आणखीनच तीव्रता आली. काँग्रेस भवनच्या भिंतीवर चढून कार्यकर्ते घोषणा देऊ लागल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते देखील त्यांच्या दिशेने जाऊ लागले. त्यामुळे अचानक आंदोलन चिघळले गेले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला काढण्यास सुरूवात केली. पण, त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात वाहनांच्या काचा फुटल्या. तर, काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. तेव्हा दोन्ही बाजूने दगफेक झाली. यामध्ये पोलिस, पत्रकार आणि भाजपचे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. अचानक झालेल्या याप्रकाराने मात्र, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिसरात शांतता राखण्याचे प्रयत्न केले. पण, कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत होते. काँग्रेसने आंदोलन तसेच दगफेकच्या निषेध करत पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांंचे कार्यालय गाठले आणि तिथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. काँग्रेसकडून भाजपच्या महापाैर, शहराध्यक्ष यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरू केली.
दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडून दगडफेक सुरू झाल्याचा दावा केला असून, आत्मरक्षणार्थ प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने मात्र भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
पुणे पोलिसांचे सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, “दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याची नोंद आहे. या घटनेत ३ काँग्रेस, २ भाजप कार्यकर्ते, २ पोलिस कर्मचारी आणि २ पत्रकार किरकोळ जखमी झाले आहेत. परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”